१. मी कवीता करतो म्हणजे मी कविता करतो.
२. मी कविता लिहितो कारण मला कविता लिहायची असते.
३. कविता लिहावीशी वाटते अशा अपरिहार्य क्षणात मी कविता लिहितो. कविता लिहिली नाही तरी चालेल असं जर वाटलं तर कदाचित मी कविता लिहीणारही नाही. पण माझ्या मेंदूत सतत वाजत राहणारी कविता मी थांबवू शकत नाही.
४. कविता लिहिणे ही माझ्यासाठी एक अत्यंत खाजगी बाब आहे. कविता लिहिताना जी काही प्रक्रिया मेंदूत घडून येत असेल ती आनंद देणारी असते, या अर्थाने मी माझ्या आनंदासाठी कविता लिहितो.
मात्र कविता लिहून झाली की ती वाचकांसमोर यावी असं मला तीव्रतेने वाटते. कविता वाचून चार वाचक आपल्याला दाद देतात, बरी-वाईट प्रतिक्रिया देतात, कवितेचा अन्वयार्थ लावतात. ही देवाण-घेवाण आनंददायी असते.