काय पाहतोयस पटरीकडे
पटरीये ती
तिचा अंत माहित नसला तरी
फिरून फिरून याच ठिकाणी
येणाराय ती
जिथे तुझे डोळे खिळलेलेयत


हात फिरवू नको
डिप्रेस्ड खुंटांवरून
कोनाड्यातलं फिकट हिरवं सलून
सुहास्य वदने तुझ्या स्वागतासाठी सज्जंय

निळ्या लाकडी खूर्चीवर मान टाक
ऐसपैस
नी बैस पाय ताणून आरामशीर

हजामाचा वस्तरा फिरतो दाढीवरून
तेव्हा भणंगसुद्धा असतो राजा

कोकाकोलाच्या हिरव्या बाटलीतला
थंड शिडकावा धुवून काढेल
तुझ्या चष्म्याच्या काचेवरील उदासी

मग दिसेल तुला
या पटरीवर सालोसाल
एकाच जागी खिळला गेलेला वेग


थाडथाड उडतात या रिकाम्या प्रतिक्षारत खुर्च्या
ट्रेन धावते जेव्हा
पटरीवरून

काथ्याच्या गाद्यांची तारांबळ
मग पुन्हा गांड जागच्याजागी हलवून
त्या स्थिरस्थावर होतात
ट्रेन निघून गेल्यावर

पारा उडत चाल्लेला आरसा
भिंतीला अधिकच बिलगू पाहतो
पण भिंत ढीम्म
चेहऱ्यावरची रेषासुद्धा हलू देत नाही
ट्रेन निघून गेल्यावर
आरश्यातला मघाचा वाळत घातलेला कुर्ता
झालेला असतो पसार विदाऊट तिकीट पायजम्यासकट
बनियान आणि अंडरवेयर
पाहत राहतात आरशात आपलं अनाथ रूप
देवादिकांच्या एरवी
रौब झाडणाऱ्या पाच तस्बिरी
मूठ आव्ळून बस्तात
ट्रेन पटरीवरून धावताना
लायटीच्या बॉक्सशेजारी गुमसूम
आणि जीव भांड्यात पडल्यासारख्या
सैलावतात ट्रेन निघून गेल्यावर
कळत नाही त्यांना
सलूनच्या बरकतीची राख झालेली अगरबत्ती
कुठे झाली गायब

कित्येक देहांचा घाम शोषून
पांढरा पडलेला काळा अॅप्रन
उडत उडत निघतो ट्रेनच्या पाठोपाठ
उडून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न
निपचीत पडून राहतो पटरीवर
ट्रेन निघून गेल्यावर
हजाम लगबलीत उचलून आणतो जिंदा लाश
आणि अडकवून ठेवतो गंज पकडलेल्या खिळ्यावर

मिनव्हाईल
हजामाला आपल्या लुंगीशी
करावी लागलेली असते जीवापाड झटापट
आपलं आहे नाही ते सगळं
पडू नये उघडं
ट्रेन पटरीवरून धावताना म्हणून


काय शोधतोयस
तीच ट्रेन पुन्हा कधीच धावत नसते
या निपचीत पटरीवरून
कोनाड्यातल्या सलूनची तारांबळ
नेहमीसारखी तीच