गोष्ट उर्फ कानी

झाडांच्या सळसळीची भाषा
मला समजायची
ही तेव्हाची गोष्टंय

ऋतुंचा वास मला
ओळखू यायचा
ही तेव्हाची गोष्टंय

तळपाय मातीने माखलेले असायचे
तेव्हाची ही गोष्ट आहे

कलकलाट होता अंगणात
सकाळ संध्याकाळ
घूमी शांतता वस्तीला यायच्या आधी
तेव्हाची

छातीतून
फुलपाखरांचा थवा
तरंगू लागला होता नूकताच
ही तेव्हाची गोष्टंय

आजी मेली
गोष्टं म्यूट झाली

ही त्याच्या आधीची गोष्ट आहे

खोडरबर

एकेक रेषा काढत होती मूलगी
निरखत होती, खोडत होती
मनासारखं उतरत नाहीये चित्र कागदावर म्हणून

टोकदार त्रिकोणी ठोकळ्यांची शिस्तबद्ध रांग
आखूड किरणांचा चपटा सुर्य
अशक्त पंखांचे निर्जीव चौकीचार

खोडत होती कागदावरचा निर्जीवपणा
मुलगी, पून:पून्हा गिरवत होती पेन्सील

तिच्या मेंदूतल्या वळणदार डोंगरांच्या रांगा
टोकदार कीरणांचा गोल सुर्य
फडफडणारे चौकीचार
हळूहळू आकार घेत होते
कागदावर हुबेहुब

मुलीला म्हटलं
खोडरबर दे जरा
खोडून काढतो
माझ्यातलाही काही भाग

गिरवतो पेन्सिल पुन्हा स्वतःवरून

चिमणी

चिमणी नाही आहे

जी चिमणी आहे
ती चिमणीच आहे असं नाही

एकदा मी पाहिली होती चिमणी
ख्रिस्ताच्या लाकडी खांद्यावर बसलेली

पुन्हा कधीच दिसली नाही
म्हणजे दिसली पण तशी नाही
जशी एकदा दिसली होती

खांदा लाकडीच होता
पण बदलला होता
चिमणी बदलली होती
बसणं बदललं होतं
आणि माझं पाहणं

मी जसं एकदा पाहिलं होतं
चिमणीला ख्रिस्ताच्या लाकडी खांद्यावर बसलेलं
आणि कुजबुजताना ख्रिस्ताच्या सर्वज्ञ कानात
तसं पुन्हा कधीच पाहू शकलो नाही

ख्रिस्त विव्हळला होता
हे पित्या शक्य असेल तर
हा प्याला माझ्याकडून कधीच हिरावून घेवू नकोस

पण पिता घातकी
नेहमीसारखाच
चर्चच्या घंटा घणघणल्या
आणि माणसांची पावले वळू लागली चर्चकडे

चिमणी नाही आहे

आणि असलीच जर चिमणी
तर काय फरक पडतो
किंवा नसल्यानेही

ख्रिस्ताने आपले लाकडी कान
झाकून घेतले आहेत.

प्रेमळ साक्षात्कार

लव इज अ डॉग फ्रॉम हेल*
पहिलीच ओळ घनघनली डोक्यात
प्रेमळ कविता लिहिताना

चाळल्या आजवर लिहीलेल्या सर्व कविता
प्रेम हा शब्द सापडला नाही.

कुत्रा सापडला
कुत्र्याला कुरवाळलं
खूप कुरवाळलं… खूप… खूप
कु र वा ळ लं
कंटाळा येईपर्यंत

कंटाळ्यात अनुक्रमे खालील साक्षात्कार झाले

साक्षात्कार १:  जगाने माझ्यावर खूप खूप प्रेम केले. इतके प्रेम केले की मी आज जीवंत आहे

साक्षात्कार २: मी खूप प्रेमळ आहे. इतका प्रेमळ की एकदा एका निराश माणसाचा हात घेणारच होतो मी माझ्या प्रेमळ हातात इतक्यात तो विनोदकुमार शुक्लंनी घेतला.

साक्षात्कार ३: माझे पंतप्रधान खूप खूप प्रेमळ आहेत. ते इतके प्रेमळ आहेत की एकदा लहान मुलांना त्यांनी एक रुपयाचा कॉइन कवटीच्या मागून ढकलून तो कपाळातून बाहेर काढून दाखवण्याची प्रेमळ जादू दाखवली तेव्हा एक टीव्ही अॅन्कर घळाघळा रडली.

साक्षात्कार ४: माझा एक मित्र पुरोगामी आहे आणि हेच तो प्रेमळ असण्याचं एकमेव कारण आहे. फक्त हे जग त्याला जसं हवंय तसं नाहीये.

साक्षात्कार ५: झाडं प्रेमळ असावीत पण त्यांना प्रेम म्हणजे काय ते माहीत नाहीये

साक्षात्कार ६: माझी आई खूप खूप प्रेमळ आहे. ती इतकी प्रेमळ आहे की तिने एकदा उंदराला मरेस्तोवर मारलं. तेव्हापासून आजतागायत उंदराने माझे तळपाय कुरतडले नाहीयेत.

साक्षात्कार ७: खिडकीच्या गजावर एक चिमणी अलगद येवून बसलेली आहे. खिडकीच्या अलीकडे मी कविता लिहीत असल्याचं तिला माहीत असतं तर ती इतकी निर्धास्त बसलीच नसती.

प्रेम म्हणजे खिडकीच्या गजावर
निर्धास्त बसलेली चिमणी

 

(*love is a Dog from hell ही चार्ल्स बुकोवस्की यांच्या कवितेतील एक ओळ आहे.)

ही कविता करेल तुम्हाला १००% थक्क

१.
हे सीसीटीवी फुटेज पाहून
तुम्ही थक्क व्हाल

मग मी थक्क होण्यासाठी
सीसीटीवी फुटेज पाहतो

थक्क होण्याची वाट पाहतो.
थक्क होण्याची वाट पाहतो.
थक्क होण्याची वाट पाहतो.
थ क्क हो ण्या ची वा ट पा ह तो.

थ थडग्यातला

क कपातला क
क ला जोडलेला आणखी एक कपातला क
क्क

थ क्क

पंधरा सेकंदांनी

थक्क होण्याचा कंटाळा येतो

२.
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पतीच्या निधनानंतर
घेतला मोठा निर्णय

दूसरं लग्न करते की काय?

प्रसिद्ध फिल्ममेकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे पती यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला असून तिने आपल्या इन्स्टा प्रोफाईलचा फोटो बदलून तिथे चक्क ब्लॅक रंगाचा पीक ठेवला आहे.

मी थक्क म्हणजेच
मेरा चूतीया कट गया ऑलरेडी

तुम्हारा?