काळाच्या आधी तु नव्हतास
काळाच्या नंतरही
फारतर मेंदूतल्या निष्कलंक पोकळीत
होतास तु दुर्लक्षित कल्पना
तुला कोणी नव्हता वाली
नव्हता कोणी वाल्मिकी
तुला शब्दरूप देईलसा
आणि इडन गार्डनमध्ये
एवेच्या हातातील सफरचंदातून
किंवा कुठल्याही जंगलात
आम्ही भवताली फेर धरून नाचत असलेल्या आगीतून
तु अवतीर्ण झालास
शाळकरी शेंबडं पोर जसं अवगत करतं
अंगावर ठिकठिकाणी केसं उगवू लागल्यावर
आक्रमक भाषा
तशीच सापडत गेली तुला तुझी भाषा
काही प्रश्न होते आमच्या मनात
त्यांचं तु उत्तर झालास
काही आश्चर्याचे धक्के बसले आम्हाला
त्यावर तु उतारा बनलास
भितीने गाळण उडाली आमची
तु तुझ्या मधाळ वाणीने आम्हाला धीर दिलास
शिकार करताना निश्चल पडला
आमच्यातल्या एखादयाचा देह
तु तुझ्या अगम्य भाषेत आमचं सांत्वन केलंस
आमच्या मेंदूपलीकडे तु स्वर्गाचा देखावा उभारलास
आणि गांडीखाली नरकाचा काळोख
ज्याच्यात सापडणार नाही माणसाला माणूस
किंवा लागणार नाही मागमूस ईश्वराचा
अशी तजवीज तु करून ठेवलीस ग्रंथबद्ध
आमच्या कवितांचे कॉपीराईट्स
तु तुझ्या नावावर करवून घेतले
आमच्या ओव्या आमचे अभंग वचनं दोहे
साऱ्यातून तु होत गेलास संक्रमित
पिढया दर पिढया
तु पाझरत राहिलास आमच्यातून
आमच्या पेनातली संपेपर्यंत शाई
आम्ही झाडाखाली चिंतन केलं
सापडवले काही नियम
तर तु आयत्या नियमावर येऊन बसलास नागोबा
आम्ही क्रुसावरून क्षमेचे शब्द उच्चारले
तर तु त्या क्षमेचं
दोन हजार सालाइतकं लांबलचक लचांड
आमच्या मानगुटीवर बसवलंस
भेदाभेद अमंगळ म्हटलं आम्ही
तर तु केलास भेदा-भेदाचा मंगळ
आमच्या कुंडलीत कायमसाठी इन्स्टॉल
सरकत राहिलं तुझं निर्दैवी अस्तित्व
आम्ही निर्माण केलेल्या
प्रत्येक व्यवस्थेत
तुझा सत्तातूर डोळा जाणून होता
आमच्या भोळयाभाबडया भक्तीचं सामर्थ्य
तुला अचूक नॉलेज नफ्याचं
दिनदुबळयांच्या सेवेतलं
उभारून ठेवल्यास तु आमच्या भवताली
दहा दिशांना दहा भिंती
विदाऊट विंडोज
आमच्या श्वासा-उच्छवासात तु
माजवून ठेवलीस दहशत नैतीकानैतीकतेची
पापापुण्याची बऱ्यावायटाची
वर करून ठेवली सोय धंदेवाईक
कन्फेशनची सायंटिफीक
नास्तिकांच्या निर्दयाळू चिमटीत
सापडलीच होती तुझी मानगुट
तर तु तिथूनही निसटलास
ठेवून त्यांच्या रिकाम्या चिमटीत
सत्तालालसेचं आकर्षक गुलाब
तु कधी झालास सत्तेचं सिंहासन
कधी सत्तेच्या माजूर घोडयावर
होऊन आरूढ अंकित केलंस अंतरिक्ष
तुझ्या स्वर्गबंदिस्त ईश्वराने
माफ केला होता आब्राहामाला त्याच्या एकुलत्या मुलाचा बळी
तर त्याच्या बदल्यात तु
आणखी किती जीव करणारहेस स्वाहा
तुझ्या धगधगत्या आगीत