कवी चिंतनात दंग झाला होता. चिंतनात दंग असताना कवी मेंदूतलं क्रिएटिविटीचं केंद्र शोधत होता. या केंद्रावर एकदा का ताबा मिळवला की प्रचंड कविता प्रसवता येतात अशी कवीची खात्री होती. त्याप्रमाणे दिर्घकाळापासून कवी चिंतन करत होता. चिंतन करता करता कवी खूप एकाग्र झाला. कवीने मेंदूवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले. मेंदूतलं एकेक निद्रिस्त केंद्र जागवण्यास कवीने सुरुवात केली. एकेक केंद्र जागं होत होतं तसा कवी खोल खोल जात होता. खोल खोल. दूर दूर. जागेपणापासून दूर. निद्रिस्त. निद्रेच्याही पलीकडे. खोल खोल.
ठो ठो ठो
हा तिसरा आवाज. याआधी दोनदा असा आवाज आला होता. त्यावेळीसुद्धा कवीला युफोरियाचा अनुभव आला होता. कवीच्या मेंदूला अत्यानंद झाला होता. ठो ठो ठो आवाजाचा आणि मेंदूला अत्यानंद होण्याचा काहीतरी घनिष्ठ संबंध असावा या निष्कर्षाप्रत कवी सहज पोहचला. कारण या तिसर्या ठो च्या वेळीसुद्धा कवीच्या मेंदूत अत्यानंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कवी मेंदूच्या गहन दुनियेत अक्षरश: तरंगत होता. आणि कवीला प्रश्न पडला, यावेळी कोण?
कवीने डोळे उघडले. दक्षिणेकडची खिडकी उघडली. बाहेर पाहिले. कवीने डोळे किलकिले करून पाहिले, यावेळी कोण? कवीच्या निर्मितीक्षम मेंदूला चेतवणारा हा तिसरा कोण? असा प्रश्न कवीला पडताच कवीव्यतिरिक्त ज्यांच्या मेंदुमध्ये खोल खोल आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या असा एक जमाव प्रवेश करता झाला. हा जमाव ठो ठो ठो आवाज यायच्या आधीपासूनच विंगेत तयार असल्यासारखा मंचावर अवतीर्ण झाला होता. कवीने जमावाच्या चेहर्यावर निरखून पाहिले. जमावाच्या हातात पोश्टर्स. ओठांवर घोषणा. चेहर्यावर अती दु:ख. मेंदूत आनंद होता. कवीने स्वत:कडे बघितले. कवीच्या चेहर्यावर दु:ख पसरलं होतं. हातात पेन. पुढ्यात कागद. मेंदूत आनंद.
कवी दु:खानंदातिरेकाने उठला. कोनाड्यातील मेणबत्ती बाहेर काढली. समोर खोल खोल, दूर दूर खोलवर गेलेला मेंदू होता. कवीने त्या मेंदुमध्ये तिसरी मेणबत्ती रुतवली. आधीच्या दोन मेणबत्त्या संपूर्णपणे वितळून मेंदूवर पसरल्या होत्या. मेंदूत खोवलेली तिसरी मेणबत्ती आता जळत होती. मेंदूतील सर्व केंद्रे त्या मंद उजेडात निद्रिस्त. खोल खोल. दूर दूर दूर. पलीकडे. कुठे?