मग मी खिशातून मोबाईल बाहेर काढतो

कोणाचा कॉल तर नाही ना?

किमान एखादा मेसेज?

वॉलपेपर छानऐ

समाधानाच्या उकळ्या मेंदूत

मग मी मोबाईल खिशात ठेवून देतो

 

मग मी खिशातून मोबाईल बाहेर काढतो

वॉट्सअप चेक करतो

हसतोखिन्नतोगंभीरतोचिंताग्रस्ततोकंटाळतो

आनंदाचे तरंग मेंदूवर उमटतात

मग मी मोबाईल खिशात ठेवून देतो.

 

मग मी खिशातून मोबाईल बाहेर काढतो

फेसबुकवर सतरा नोटिफिकेशन्स

स्वत: प्रधानसेवक मन की बात करत असतात

हसावं की रडावं?

मग मी मोबाईल खिशात ठेवून देतो

 

मग मी मोबाईल खिशातून बाहेर काढतो

पाहतो

मेंदूत काहीच होत नाही

मग मी मोबाईल खिशात ठेवून देतो

 

मग मी मोबाईल बाहेर काढतो

मग मी मोबाईल ठेवून देतो

 

मोबाईल बाहेर काढतो

ठेवून देतो

 

बाहेर काढतो

ठेवून देतो

 

मग मी खिशातून मेंदू बाहेर काढतो

पाहतो

हा मेंदूय की धुकंय

मग मी धुकं खिशात ठेवून देतो