पुस्तकदिनानिमित्त पुस्तकाशी संवाद

तुझ्यासोबत जगलेला एखादा क्षण
साजरा करावासं कधी वाटलं नाही मला

तुझ्याशी जोडलेली एकही गोष्ट
मला आठवत नाही आज
कि फेसबुकवर डकवता येईल श्टोरी

आठवत नाही कधी घेतलं
मी तुला पहिल्यांदा हातात आणि चाळलं

नाकात साठवून घ्यावासा वाटला नाही
तुझ्या पानांचा वास मला कधी
की तो आज श्वासभरून आठवेल

रोमांचित होण्यासाठी मी
कधीही केला नाही तुला स्पर्श
बेसुमार भुकेच्या काळात
तुला ओरबाडलं, भूक शमली नाही

उलट त्वचेसारखी चिकटली अस्तित्वाला

फसलेल्या संभोगासारखं आपलं नातं
अपराधी डोळ्यांनी
नजर चुकवत राहिलं आजतागायत

अविर्भावाची वाफ

ह्या गारठलेल्या हॉलमध्ये

ओठांवरून जीभ, हॉलभर नजर फिरवत

एक एक शब्द कोरतोय कवी

 

कवीला खात्रीय

जे न देखे रवी ते आपल्याला दिसतंय

आपण जे खरडलय कागदावर

तेच तर उमटलेलं मेंदूत

आणि जे आणि जितकं उमटलेलं

तेच तर आपल्याला समजलय.

त्यापेक्षा वेगळं समजावं असं या जगात आणखी कायंय?

आणि या जगापेक्षा आणखी वेगळं जग

असण्याची काय शक्यताए

आपल्या मेंदूच्या आकारात फिट्ट बसलेल्या या कवितेत

 

शब्द जे या हॉलमधल्या थंडीत

गारठलेल्या इतर मेंदूंच्या आकारात फिट्ट बसताएत

कवीला वाटतं आपण कोरतोय

एकेक शब्द

ह्या हॉलमधल्या गारठलेल्या नास्तित्वावर

 

आणि कवीच्या तोंडून शब्दाऐवजी

बाहेर पडते अविर्भावाची वाफ.

नाही त्यावर?

जेव्हा मी गिरवत होतो नास्तिकतेचे
प्राथमिक धडे

खळखळाट
खळखळाट
खळखळाट

स्वच्छ स्पष्ट लख्ख होतं आकाश
किंवा तसा आभास

मस्तीत होतो चालत
फुल्ली मारत जे जे नाही त्यावर

नाही त्यावर?
प्रश्नाने पुसली बुबूळाची नास्तिक काच

‘न’च्या ब्लॅकहोलमधून
गेलो पलीकडे

अधिक स्वच्छ अधिक स्पष्ट अधिक लख्ख
दिसू लागलं आकाश
किंवा तसा आभास

खळखळाट
खळखळ
खळ

आत्मशोधाच्या पायथ्याशी

  1. असोशी

आत्मशोधाच्या पायथ्याशी

ब्रम्हानंदी मेंदू

 

देहास्तित्व नाकपुड्याशी

आत-बाहेर

 

कण कण

निसटता क्षण

 

हर क्षण

वितळत

 

वि त ळ त

 

तादात्म्याच्या असोशीत

टल्लीन

 

  1. साक्षात्कार

तिलांजलीचा लावला टिळा

लॉजिक कपाळी

कि हे शिखर

धूसर

होते सर

 

तादात्म्य

माझ्या आणि तुमच्या

मेंदूतल्या चिंध्या

 

साक्षात

साक्षात्काराला

सामोरे साक्षीभावी डोळे

 

  1. बुडबुडा

तादात्म्य चिंध्या

इतक्या तादात्म्य

 

कि हलक्या हलक्या

फुलपाखराच्या पंखांइतक्या

 

फुलपाखरू छान किती दिसते

फुलपाखरू

मेंदूत माझ्या आणि तुमच्या

रें गा ळ ते

 

रें  गा  ळ  ते

 

आत्मशोधाच्या

पायथ्याशी

 

फुलपाखरानंदी

बुडबुडा ठो

परतीची पायपीट आणि लॉकडाऊनची लक्झरी

भिंतींकडे निरखून पाहिलं.
दरवाज्यांची कुरकूर ऐकली.
किचनमध्ये रेंगाळलो.
कुथत कुथत मुळव्याधीला कुरवाळलं.
गॅलरीतली शुद्ध हवा नाकपुड्यात भरून घेतली.
श्वास रोखून धरला शेचाळीस सेकंद
बायको म्हणाली स्ट्राँगयेत तुझी फुप्फुसं.

हळहळलो कष्टकरी जगाची परतीची पायपीट पाहून
हळहळीची पोष्ट टाकली
उत्सुकतेने पाहत राहिलो पोष्टीवर
हळहळीच्या पुरात वाहून गेलं फेसबूक

बायकोला म्हटलं कठिणंय जगाचं
उपाय म्हणून बायकोने कांदाभजीचा बेत तळला
मीठ का काय कमी होतं ते चाखत निवांत झालो
जमेल तसा आजाराचा उत्सव वाजवला

मुलीच्या खोकल्याकडे संशयाने पाहिलं.
बायकोच्या शिंकेपासून दहा हात लांब राहिलो.
स्वत:ला घेता येईल तितकं गुंंडाळून घेतलं.
सर्दी खोकला आत दाबून धरला.

कंटाळ्याची वाजवली टाळ
भितीची पूजा केली

दिवस मोजत राहिलो
तास मिनिट सेकंदकाट्यातून
सरत राहिलो रिकामा दिवसेंदिवस
रात्री ओवाळून टाकल्या नेटफ्लीक्सवरून

वाचलो बचावलो तर
जाता येईल एका मरणाच्या तावडीतून
दुसऱ्या मरणाच्या तावडीत सुखरूप म्हणत
पहाटे झोपलो
तर परतीची पिडादायक पायपीट
मानगूट सोडायला तयार नाही