लव इज अ डॉग फ्रॉम हेल*
पहिलीच ओळ घनघनली डोक्यात
प्रेमळ कविता लिहिताना

चाळल्या आजवर लिहीलेल्या सर्व कविता
प्रेम हा शब्द सापडला नाही.

कुत्रा सापडला
कुत्र्याला कुरवाळलं
खूप कुरवाळलं… खूप… खूप
कु र वा ळ लं
कंटाळा येईपर्यंत

कंटाळ्यात अनुक्रमे खालील साक्षात्कार झाले

साक्षात्कार १:  जगाने माझ्यावर खूप खूप प्रेम केले. इतके प्रेम केले की मी आज जीवंत आहे

साक्षात्कार २: मी खूप प्रेमळ आहे. इतका प्रेमळ की एकदा एका निराश माणसाचा हात घेणारच होतो मी माझ्या प्रेमळ हातात इतक्यात तो विनोदकुमार शुक्लंनी घेतला.

साक्षात्कार ३: माझे पंतप्रधान खूप खूप प्रेमळ आहेत. ते इतके प्रेमळ आहेत की एकदा लहान मुलांना त्यांनी एक रुपयाचा कॉइन कवटीच्या मागून ढकलून तो कपाळातून बाहेर काढून दाखवण्याची प्रेमळ जादू दाखवली तेव्हा एक टीव्ही अॅन्कर घळाघळा रडली.

साक्षात्कार ४: माझा एक मित्र पुरोगामी आहे आणि हेच तो प्रेमळ असण्याचं एकमेव कारण आहे. फक्त हे जग त्याला जसं हवंय तसं नाहीये.

साक्षात्कार ५: झाडं प्रेमळ असावीत पण त्यांना प्रेम म्हणजे काय ते माहीत नाहीये

साक्षात्कार ६: माझी आई खूप खूप प्रेमळ आहे. ती इतकी प्रेमळ आहे की तिने एकदा उंदराला मरेस्तोवर मारलं. तेव्हापासून आजतागायत उंदराने माझे तळपाय कुरतडले नाहीयेत.

साक्षात्कार ७: खिडकीच्या गजावर एक चिमणी अलगद येवून बसलेली आहे. खिडकीच्या अलीकडे मी कविता लिहीत असल्याचं तिला माहीत असतं तर ती इतकी निर्धास्त बसलीच नसती.

प्रेम म्हणजे खिडकीच्या गजावर
निर्धास्त बसलेली चिमणी

 

(*love is a Dog from hell ही चार्ल्स बुकोवस्की यांच्या कवितेतील एक ओळ आहे.)