मी कधी स्पर्श केला नाही झाडाला.
कधी पाणी नाही घातलं बुडाशी.
कधी बघितलं नाही बारकाईने
की कसं एका बीमधून उगवून आलं रोप
आणि मुळावत गेलं घट्ट मातीत
आणि झेपावत गेलं आकाशात.
कधी कौतुक केलं नाही हिरव्या रंगाचं.
फॉरेस्ट ग्रीन उठून दिसेल भिंतीला,
बायको म्हणाली. तसं केलं.
आरामखुर्चीत बसून भर दुपारी
उन्हाची कल्पना करत भिंतीच्या सावलीत
गार बसलो.
दाह कमी नाही झाला.
तहानेने घसा कोरडा झाला.
आरोचं पाणी प्यायलो.
मी कधी पाण्याला स्पर्श नाही केला.