१.
माझ्या कवटीत
हजारो चिमण्या
हजारो वर्षांपासून
रूजत घातलेल्या
आता फुलल्या आहेत
चिवचीवाट चीवचीव
किलबिल कलकलाट
सुसुत्रबद्ध गोंधळ
या गोंधळातून
तुम्ही म्हणताय
एक चिमणी निवडा
एक चिमणी जी योग्य असेल
एक चिमणी जी हे जग सुंदर बनवेल
एक चिमणी जिची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात
एक इवलीशी,
खीजगणतीच्याही गीणतीत न येणारी
आत्ता होती आणि आत्ता नाहीच्या मध्ये
जमेल तेवढं चिवचीवणारी
आपण चिवचीवतोय याचंही भान
तिला आहे की नाही कुणास ठाऊक
२.
योग्य चिमणीला नेमकं पकडतां यावं चिमटीत
म्हणून मी बसलो होतो एका झाडाखाली
सापडली चिमणी चिमटीत
आणि चिमटी चिवचीवायला लागली
चिमटीच्या चिवचीवीला फुटले चिमण्यांचे धुमारे
कधीतरी त्यातली एखादी चिमणी
तुमच्या चिमटीत अलगद सापडते
आणि तुमची चिमटी चिवचीवायला लागते.
आत्ता आहेः योग्य चिमणी
आत्ता नाहीः चिमणी गुडूप
आणि तुम्ही तुमची चिमटी गोंजारत बसता
३.
योग्य चिमणीच्या शोधात
मी वजा करत गेलो एकेक करून सर्व चिमण्या
तरी वजाबाकीची एक चिमणी
उरलीच शिल्लक
आणि वजाबाकीच्या उरलेल्या चिमणीकडे
गमतीने बघणारी
एक चिमणी
आणि गमतीने बघणाऱ्या चिमणीकडे
बघणारी आश्चर्यचिमणी
आणि अशीच न संपणारी लांबलचक शेपूट
चिमण्यांची
वजाबाकीनंतर उरलेली